नंदुरबार - राज्याचे गृहमंत्री यांच्यावर राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. एनआयने अटक केलेल्या सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुल करण्यासंदर्भात आदेश दिले होते. ही बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याला काळीमा फासणारी आहे. या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ नंदुरबार भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी-
महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे. हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख सचिन वाझेंना दर महिना 100 कोटींची वसुली करण्यास सांगायचे. पोलिसांना वसुली करायला लावणारे गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही. ठाकरे सरकार हे पूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतलेले आहे. ठाकरे सरकारने कितीही साळसूदपणाचा आव आणला तरीही आता ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचा खुलेआम पर्दाफाश झाला आहे. आता केवळ अनिल देशमुख यांनी राजीनामा न देता संपूर्ण ठाकरे सरकारने पायउतार व्हावे! अनिल देशमुख यांची 100 कोटींची गोष्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार सर्वांना ठाऊक होती. परंतु सर्व गप्प होते. महाराष्ट्राची अशी बदनामी करणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही. जर थोडीही लाज शिल्लक असेल तर ठाकरे सरकारने त्वरित राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या 11.5 कोटी जनतेची सार्वजनिक स्वरुपात माफी मागावी.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नंदुरबार शहरातील नगरपालिका परिसरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सपना अग्रवाल, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, महिला मोर्चा प्रदेश सदस्य सविता जयस्वाल, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, महिला मोर्चा शहराध्यक्ष योगिता बडगुजर, शहर सरचिटणीस खुषाल चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, अशोक चौधरी, समीर मंसुरी आदी उपस्थित होते.
हेही वाचा- अँटिलिया प्रकरणाच्या तपासात केंद्राने हस्तक्षेप करावा, अनेक नावे पुढे येतील - राज ठाकरे