नंदुरबार - रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील मजूर दिवाळीपूर्वी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत असतात. राज्यभर निवडणुकीचे वातावरण असतानाही जिल्ह्यातील आदिवासी भागातील हजारो कुटुंब रोजगाराच्या शोधात गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात स्थलांतर करत आहेत. या स्थलांतराचा परिणाम मतदानावर होणार असून मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आदिवासी ऊस तोडणी कामगारांचे स्थलांतर राजकारण्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्षांचे नेते आश्वासने देतात. मात्र, या आश्वासने आणि मतदानापेक्षा पोटाची खळगी भरणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे स्थलांतर करणार्या कामगारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - विकास हवा; मात्र त्यासाठी झाडे कापू नयेत, हेमामालिनींचा भाजपला घरचा आहेर
जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. मात्र, जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला अजूनही यश आलेले नाही.