नंदुरबार - नवापूर शहरातील गांधी पुतळा ते गुजरातच्या गांधीनगरपर्यंत धुळे-सुरत महामार्गावर मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत आहे. पोटाचा प्रश्न पेटल्याने लॉकडाऊनदरम्यान महानगरात जगणे महाग झाले आहे. अशात गावी जाण्याशिवाय पर्याय नाही. मिळेल त्या वाहनाने गुजरात राज्यातील मजूर गावी जात आहेत. कोणी पायी, तर कोणी सायकल, मोटरसायकल, ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स, बसने मार्गस्थ होत आहे.
लॉकडाऊनदरम्यान रोजगार नसल्याने हाताला काम नाही. घरातील अन्नधान्य संपले असून बाहेर जाता येत नाही. सर्व पर्याय संपल्याने उपाशी मरण्यापेक्षा धोकादायक परिस्थितीत आपल्या गावी जाण्याचा मार्ग या कामगारांनी निवडला आहे. राज्य सरकार व केंद्र सरकार मजुरांची सोय व्हावी म्हणून त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी देत आहे. परंतु, या परवानगीचा गैरफायदा घेत जनावरांप्रमाणे कोंबून मजुरांचे स्थलांतर केले जात आहे.
ट्रक, टेम्पोत सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नाही, तोंडाला मास्क नाही, लहानग्यांची कुठलीही काळजी नाही. अशा धोकादायक परिस्थितीत स्थलांतर सुरु आहे. यादरम्यान पायपीट करणाऱ्या मजुरांसाठी पोलीस देवदूत बनून धावून आले आहेत. या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था पोलीस करत आहेत.
कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव, सुरत, मुंबई, पुणे अशा भागातून मध्यरात्री मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतर करत असल्याचे बोलले जात आहे. परंतु, रात्री पाहणी केली असता पिंपळनेर चौफली, सीमा तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त करीत असताना दिसून आले. त्यामुळे, अफवांवर विश्वास ठेवू नये. सोबतच असे काही आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील पोलीस बंदोबस्त व आरोग्य तपासणीदेखील कडक होणे गरजेचे आहे.