नंदुरबार - नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमध्ये आजपासून (23 जुलै) आठ दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या संचारबंदीतून चारही शहरांमधील नगरपालिका क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या शेतीशी निगडीत खते, बी-बियाण्यांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 यावेळेत सुरू ठेवण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. तसेच अत्यावश्यक बाबींसंबंधी अस्थापने आणि दुकाने सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आदेशात नमुद केले आहे.
बँकांच्या आस्थापना नियमित वेळेत सुरू राहणार असल्यातरी ग्राहकांसाठी बँक बंद राहतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी आदेशात नमुद केले आहे.
जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या 23 जूलै ते 30 जुलै दरम्यान लागू केलेल्या कडक संचारबंदीच्या काळात चारही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्राच्या ठिकाणी गॅस एजन्सी मार्फत केवळ घरपोच गॅस सिलेंडर पोहोचविण्यासाठी मुभा राहील. नंदुरबार जिल्ह्यातील रनाळे, विसरवाडी, खांडबारा, प्रकाशा, खापर, मोलगी या ग्रामीण भागात लोकसंख्या अधिक असल्याने तसेच कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने या गावातील सर्व आस्थापना, दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. ज्याठिकाणी गर्दी होईल. अथवा शारीरिक अंतराचे नियम पाळले जात नसतील, त्या ठिकाणी संबधीत ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाकडून तत्काळ दुकाने बंद करण्यात येतील.
संचारबंदी कालावधीत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी दिलेल्या आदेशात नमुद केले आहे.