नंदुरबार- लॉकडाऊनच्या काळात झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांची सर्वात जास्त कुचंबना होत आहे. कामधंदे बंद असल्याने त्यांना मासिक पाळीच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. नंदुरबार पोलीस मुख्यालयात असलेल्या महिला दक्षता कक्षातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांची ही व्यथा कळली आणि त्यांनी एक अभियान सुरू केले.
ग्रामीण आणि मागास भागात आजही महिन्यातील मासिक पाळीचे ते चार दिवस महिलांसाठी फार त्रासदायक असतात. त्यात कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीमुळे झोपडपट्टी भागात असलेल्या महिलांचे कामधंदे बंद झालेत. त्यात संसाराचा गाडा चालवितांना आपल्या मासिक पाळीचा काळात त्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही माहिती महिला दक्षता कक्षातील महिला पोलिसांना मिळाली, या महिला पोलीस झोपडपट्टी आणि कामगार वस्तीत मोठ्या प्रमाणात सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करत आहेत. महिला असल्याने आम्हाला त्यांचे दुख समजले म्हणून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली. आता या महिलांना लॉकडाऊनच्या काळात मनस्ताप सहन करावा लागणार नाही, असे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सांगितले.