नंदुरबार - गणेशोत्सव नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दादा व बाबांची हरीहर भेट यंदाही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झाली नाही. ना गुलाल, ना वाजंत्री आपल्या लाडक्या बाप्पाचे साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. खानदेशात नंदुरबार जिल्हा हा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
यंदाही दादा-बाबा गणपती हरीहर भेट रद्द
नंदनगरीतील मानाचा श्री दादा व श्री बाबा गणपतींच्या हरीहर भेटीला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. शेकडो वर्षांच्या परंपरा असलेल्या मानाच्या दोन्ही गणपतींची हरीहर भेट शहरातील जळका बाजार चौकात होते. दादा गणपतीचा रथ विसर्जन मार्गे फिरुन आल्यानंतर जळका बाजारात मानाचा दादा व बाबा गणपतींची विधीवत आरती करुन हरीहर भेट करण्याची परंपरा आहे. ही भेट पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते. मोरया, मोरयाचा जयघोष आणि प्रचंड गुलालाची उधळन या भेटीचे वैशिष्ट आहे. दादा गणपतीच्या रथामागे बाबा गणपती मार्गस्थ होतो. परंतु कोरोनामुळे मागील वर्षापासून मानाच्या गणपतींची हरीहर भेट व विसर्जन मिरवणुका रद्द झाले आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेचे संकट पाहता यावर्षीही दादा व बाबा गणपतींचे हरीहर भेटीविना आज साध्या सात्विकपणाने विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. सजविलेल्या ट्रॅक्टरवर दादा व बाबा गणपती विसर्जनासाठी ठेवण्यात येतील. सोनी विहीर याठिकाणी मानाच्या गणपतींचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहेत.
साध्या पद्धतीने होणार विसर्जन
मागील वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्वच सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. यासाठी शासनानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नंदनगरीतील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. परंतु शासनाच्या नियमांचे पालन करत नंदनगरीतील गणेश भक्तांसह गणेश मंडळ साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा केला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ना वाजंत्री, ना गुलालाची उधळण आणि मिरवणुक न काढता सात्विक साध्या पध्दतीने गणरायाचे विसर्जन करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील १७४ पेक्षा अधिक गणेश मंडळांकडुन ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात येईल. नंदुरबार शहरातील गणेश मंडळांकडून श्रींचे विसर्जन होणार आहे. नंदुरबार नगरपालिकेने शहरात तीन ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून त्याठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. तसेच मूर्ती संकलनासाठी पालिकेकडून संकलन वाहन सोनी विहीर जवळ ठेवण्यात येणार आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शंभर अधिकारी व एक हजार पोलीस कर्मचारी, सहाशे होमगार्ड एक एसआरपीएफची कंपनी असा बंदोबस्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीने लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - पुढच्या वर्षी लवकर या! देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील घरी बाप्पाला निरोप