नंदुरबार - गुजरातमधून पायी चालत, महाराष्ट्राच्या सीमेवर येणाऱ्या परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एसटी बसची सोय केली आहे. नवापूर चेक पोस्टवरून या गाड्या मध्य प्रदेशकडे रवाना केल्या जात आहेत. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास या चेक पोस्टवर गुजरातमधून आलेल्या मजुरांची मोठी गर्दी झाली. यामुळे प्रशासनाचे नियोजन कोलमडले. गुजरात सरकारकडून पंरप्रातीय मजुरांबाबत नियोजन करण्यात येत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास, नंदूरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या नवापूर चेक पोस्टवर पायी गावी निघालेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातील मजुरांची मोठी गर्दी झाली. या चेकपोस्टवरुन मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत मजुरांना एसटी बसने सोडण्यात येत आहे. पण, मंगळवारी बसची संख्या कमी आणि मजुरांची संख्या जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे चेक पोस्टवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नवापूर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मजुरांना तुमच्या गावांपर्यंत तुम्हाला सोडण्यात येईल, यासाठी आणखी गाड्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. पोलिसांच्या या आवाहनानंतर तणाव निवळला. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी त्या मजुरांच्या जेवणाची सोय केली. त्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत प्रत्येक मजूरांची नोंद करुन घेण्यात आली. मजुरांना सोडण्यासाठी आणखी बसेस आल्या आणि त्या बसेसमधून मजुरांना मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. याआधी नागपूर येथून परजिल्ह्यात व राज्याच्या सीमेवर मजुरांना बसद्वारे सोडण्यात येत होते.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये कोरोनामुक्त पोलीस कर्मचार्यांचे बँड पथकासह स्वागत
हेही वाचा - बामखेडा गाव पाच दिवसासाठी संपूर्ण लॉकडाऊन; बाधिताच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी रवाना