नंदुरबार- नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात महामार्ग वाहतूक पोलीस आणि राज्य तपासणी नाक्यावरील परिवहन कर्मचारी वाहनचालकांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावर नियोजनाचा अभाव व पोलिसांकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीमुळे वाहनचालकांना उघड्यावर मुक्काम करावा लागत आहे.
नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रायंगण गावाजवळ नऊ ऑगस्ट पासून पूल तुटल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 15 दिवसापासून बंद होता. व्यावसायिकांचे नुकसान टाळण्यासाठी या महामार्गावरील पेट्रोल पंप चालक आणि हॉटेल व्यावसायिकांनी लोकवर्गणीतून महामार्गाची दुरुस्ती केली.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लहान वाहने सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, या मार्गावर येणाऱ्या अवजड वाहनांकडून महामार्ग वाहतूक पोलीस आणि राज्य तपासणी नाक्यावरील परिवहन कर्मचारी पैसे घेतल्यावरच गाडी जाऊ देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया एका वाहन चालकाने ई टीव्हीशी बोलताना दिली आहे.
या मार्गाची दुरवस्था झाल्याने वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गाड्या खराब होत असल्याने उघड्यावर मुक्काम करावा लागत आहे. त्यात महामार्ग पोलीस पैसे घेतल्याशिवाय पुढे जाऊ देत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.