नंदुरबार - जिल्ह्यात मागील २४ तासांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. यामुळे नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील खर्डी नदीला पूर आला आहे. तर या नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण नागनमध्ये ६८% पाणी जमा झाल्याने प्रकल्पातून सुरक्षिततेची काळजी घेत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
तळोदा शहरातून जाणाऱ्या खर्डी नदीला पूर आला असून पुराचे पाणी नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरले आहे. मागील २४ तासांपासून सातत्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सातपुड्याच्या दुर्गम भागात अतिवृष्टी झाल्याने, पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. तळोदा शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन परिस्थतीवर लक्ष ठेऊन आहे.
जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षमतेचा असलेल्या नागन प्रकल्पात ६८% पाणी जमा झाले. दोनशे पाच पैकी दोनशे तीन मीटर पाणीसाठा प्रकल्पात जमा झाला आहे. यानंतर सुरक्षिततेची काळजी घेत प्रशासनाकडून धरणाचा एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आणखीन एक दरवाजा उघडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागन प्रकल्पातून पाणी सोडल्याने धरणाखाली असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापुर तालुक्यातील भरडू, सोनारे, महालकडू, नवागाव, दूधवे, बिलबारा, तारपाडा या गावातील नागरिकांना सतर्क राहून नदीकाठी जाणे टाळावे, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच गावातील तलाठी व सरपंचांनी या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देत मदत करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.