नंदुरबार- शहरातील एकाच कुटुंबातील दोन जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. हे रुग्ण राहत असलेल्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. नगरपालिकेतर्फे या परिसरात आरोग्य विभागातर्फे नागरिकांची तपासणी करण्यात येत असून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
नागाई नगरमध्ये मुंबईहून परतलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. यामध्ये त्याचे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी यांचा समावेश होता. या नातेवाईकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 67 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या व्यक्तीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील नागरिकांची चौकशी केली जात आहे.
कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. नगरपालिकेतर्फे परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे काम पूर्ण झाले असून आरोग्य विभागातर्फे नागरिकांच्या आरोग्य तपासणी सह प्रकृतीबाबत विचारणा केली जात आहे. त्याचप्रमाणे परिसरात बाहेरून कोणी आले आहेत का? याची देखील चौकशी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच आरोग्याबाबत कुठलीही अडचण आल्यास आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.