नंदुरबार - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण याच लॉकडाऊनचा गैरफायदा घेत नवापूर शहरातील आंतरराज्य गुटख्याची तस्करी करणारे सक्रीय झाले आहेत. सध्या लॉकडाऊन असल्याने गुटखा शौकिनांना गुटखा मिळत नसल्याचा फायदा घेत तस्कर पाच रुपयाची पुढी 50 रुपयाला विक्री करीत आहेत. गुटख्याची सर्वत्र मागणी वाढल्याने गुटखा तस्करी सक्रीय झाली आहे. संबंधित विभागांना यावर नियंत्रण मिळवणे अशक्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गुजरात राज्यातील सोनगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनगड येथे अवैधरित्या गुटखा तस्करी करत असल्याची गुप्त माहिती सोनगड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून महामार्गावरून येणारा आयसर टेम्पोची (एम एच 39 सी 682) तपासणी केली असता 84 हजार 100 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ दिसून आले. आयशर टेम्पो किंमत दोन लाख आणि एकूण दोन लाख 84 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी रजाक अलील मेमन (वय 48 रा. लखाणी पार्क नवापूर, जिल्हा नंदुरबार) जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली गुटखा तस्करी करत असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना परवानगी दिली. मात्र, याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत आहे असल्याचे समोर आले आहे. सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी पचापच थुंकून कोरोना आजाराला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात दिसत आहे.