नंदुरबार - पिसाळलेल्या कुत्र्याने अंगणात खेळणार्या बालिकेवर हल्ला करीत चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारात घडली आहे. दरम्यान, या घटनेचा पालिकेतील विरोधी भाजपा नगरसेवकांनी निषेध नोंदवित पालिकेने पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नंदुरबार शहरातील नेहरु नगरात राहणारी हितांशी महाजन (वय 6 वर्ष) ही बालिका सात ते आठ दिवसांपूर्वी घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने या बालिकेवर हल्ला केला. कुत्र्याने मानेवर व डोक्याला चावा घेत फरफटत नेल्याने हितांशी ही बालिका गंभीर जखमी झाली. तिला लागलीच उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बालिकेला सुरत येथे हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान हितांशी महाजन या बालिकेचा मृत्यू झाला आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे अनेक जण जखमी
शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना जायबंद केले आहे. हे पिसाळलेले कुत्रे बालके, महिला व वृध्दांवर भुंकत अंगावर धावून जातात. यापूर्वीही कुत्र्यांनी चावा घेतल्याने काही जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
भाजपातर्फे इशारा
बालिकेच्या मृत्यूच्या घटनेचा भाजपाच्या नगरसेवकांनी निषेध नोंदवत पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. नगरपालिकेने पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करुन कुत्र्यांना रेबीज लस द्यावी, अन्यथा भाजपातर्फे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.