नंदुरबार - तळोदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा दीड महिन्यांपूर्वी बहुचर्चित व वादग्रस्त विषयांवर तहकूब करण्यात आली होती. अखेर शासनाच्या सूचनेनुसार तळोदा पालिकेने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत नगरसेवकांनी सहभाग नोंदवित विविध विषयांवर चर्चा केली. वादग्रस्त असलेल्या तीन विषयांपैकी भाजप नगरसेवकांचा दोन विषयांना विरोध कायम दिसून आला. तर एका विषयाला सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली
दीड महिन्यांपूर्वी तहकूब झालेली तळोदा नगरपालिकेची बहुचर्चित व प्रतिक्षित सर्वसाधारण सभा अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होते. सभेचे कामकाज पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सपना वसावा यांनी पाहिले. यावोळी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अमानुद्दीन शेख, शोभाबाई भोई, अंबिका शेंडे, सूनयना उदासी, बेबीबाई पाडवी, भास्कर मराठे, सुरेश पाडवी, सविता पाडवी, योगेश पाडवी, शिवसेनेच्या प्रतिक्षा ठाकरे, काँग्रेसचे प्रतोत संजर माळी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी, कल्पना पाडवी यांच्यासह पालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत हजेरी नोंदविली.
सर्वसाधारण सभा ज्या तीन वादग्रस्त विषयांमुळे तहकूब करण्यात आली होती. त्यापैकी दोन विषयांना भाजपच्या नगरसेवकांचा विरोध कायम होता. तसेच एका विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने नगरसेवकांनी सभेच्या विषयांवर चर्चा केली. या सभेच्या अजेंड्यावर 54 विषय घेण्यात आले होते. त्यापैकी 52 विषय मंजूर करण्यात आले आहेत. तर वादग्रस्त दोन विषय नामंजूर करण्यात आले आहेत.
जवळपास 45 मिनिटे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चालणाऱ्या या सभेत मात्र कनेक्टिव्हिटी समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले. आवाजात स्पष्टता नव्हती त्यामुळे एकाच वेळी अनेकांच्या आवाजामुळे चर्चा होण्यास बाधा होत होती. परिणामतः गोंधळ अधिक पहावयास मिळाला. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सभेबाबत नगराध्यक्षांसह नगरसेवकांना तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच सभेआधी एक वेळ प्रात्यक्षिक सरावही झाला होता.
'या' वादग्रस्त विषयांमुळे सभा झाली होती तहकूब
दीड महिन्यांपूर्वी तळोदा पालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या प्रांगणात आयोजित करुन सभेची तयारी झाली होती. पण, अजेंड्यावरील विषय क्रमांक 44 हातोडा रस्त्यावरील सी.के.बायो डिझेल पंपास ना हरकत देणे, विषय क्रमांक 45 बसस्थानक रोडवरील देवेंद्र हिरालाल कलाल यांचा मालमत्तेवर परमिट बिअरबारसाठी ना हरकत देणे आणि विषय क्रमांक 47 मेनरोडवरील जितेंद्र दुबे यांच्या घरासमोरील या स्वच्छतागृह हटविण्याबाबत ठराव करणे, या विषयांवर वाद निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जावु नये, म्हणून नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा यांनी ती सभा त्यावेळी तहकूब केली होती. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर झालेल्या या सभेकडे शहरवासियांचे लक्ष लागून होते.
स्वातंत्र्यदिनी मच्छीबाजाराच्या व्यापारी संकुलात होणार ध्वजारोहण
तळोदा पालिका स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या स्वातंत्र्य दिनी (दि.15 ऑगस्ट) पालिकेचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शहरातील मच्छीबाजाराच्या व्यापारी संकुलात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी दिली.