नंदुरबार - इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या गॅस पाईपलाईनसाठी सर्वेक्षण करणार्या कर्मचार्यांना डेंगार्याने मारहाण करीत वाहनाची नासधूस करण्यात आल्याची घटना नवापूर तालुक्यातील भोमदीपाडा शिवारात घडली आहे. या मारहाणप्रकरणी तिघांविरुध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![नंदुरबार लेटेस्ट न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-02-gas-service-officer-mh10020_26112020155601_2611f_1606386361_1039.jpg)
हेही वाचा - मनसे पदाधिकाऱ्यांनी केली वीज वितरण कार्यालयाची तोडफोड.. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कर्मचाऱ्यांना मारहाण
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीची नवापूर तालुक्यातून गॅस पाईपलाईन जाणार आहे. सदर गॅस पाईपलाईनला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्यातच काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास इंडियन ऑईल कंपनीकडून सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी जिवल्या ठोगण्या गावीत रा. पिंप्राण ता. नवापूर व रेवंतराम राजस्थानी हे दोघेही आपल्या कर्मचार्यांसमवेत भोमदीपाडा शिवारात सर्वेक्षण करीत असताना दोघांनी हातातील लाकडी डेंगार्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वाहन क्र. आर.जे. 07-सी. 5605 व डि.एल.01-झेड.सी. 4149 या दोन्ही वाहनांची काचा फोडून नुकसान केले. या मारहाणीत जिवल्या गावीत, रेवंतराम राजस्थानी हे दोघेही जखमी झाले. यावेळी घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील आपल्या पथकासह हजर झाले. याबाबत जिवल्या गावीत यांनी दिलेल्या तक्रारीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात जयवंत फुलजी गावीत (रा.भोमदीपाडा), जेमा सुपड्या गावीत, वसंत नेंदड्या गावीत (रा.करंजी बु.) यांच्या विरुध्द भादंवि कलम 324, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ.राजेश येलवे करीत आहेत.
गॅस पाईप लाईनला ग्रामस्थांच्या विरोध
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या गॅस पाईप लाईन नवापूर तालुक्यातील काही गावांमधून जात आहे. या पाईप लाईन ला शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा विरोध आहे. याबाबत ग्रामस्थ, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून याबाबत नवापूर तहसीलदारांना व नवापूर पोलीस निरीक्षकांना लेखी स्वरुपात निवेदने देऊन निदर्शने करण्यात आली आहेत.
हेही वाचा - औरंगाबाद : परवानगी नाकारल्यानंतरही मनसैनिकांची वीजबिलाविरोधात आंदोलनाची भूमिका