नंदुरबार - सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आल्यावर काम जलदगतीने आणि चांगल्या प्रकारे होतात. याचा प्रत्यय शहादा-तोळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी घेतला. पाडवी यांच्या देखरेखीत योजनांचे अर्जांची छानणी करण्यात आली. शासनाद्वारे गरीब, वृद्ध, तसेच अपंग, विधवा यांच्यासाठी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळावा त्यासाठी शासनाकडे त्याची नोंद असणे गरजेचे आहे,
आमदार उदेसिंग पाडवी यांच्या देखरेखीत शहादा तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांबरोबर बसून सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनासाठी एकूण ९३७ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २०३ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
उर्वरित अर्जांमध्ये त्रुटी असल्याने परत लाभार्थ्याकडे पाठवण्यात आले आहे. येत्या काही दिवसात उरलेल्या अर्जांवरही त्रुटी पूर्ण करून लाभार्थ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी स्पष्ट केले. तसेच तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनीही योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे पाडवी यांनी आभार मानले. यापुढेही सरकारच्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत राहणार, अशी माहिती आमदार पाडवी यांनी दिली आहे.