नंदुरबार - जिल्ह्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १३७.१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पुरामुळे शहादा तालुक्यात दोघींचा मृत्यू झाला आहे.
शहादा तालुक्यात घराची भिंत महिलेच्या अंगावर कोसळून कांताबाई रायसिंग भिल्ल (वय ३५ वर्षे, रा. रायखेड) हिचा मृत्यू झाला आहे. तसेच लिलाबाई विजय सिंग पाडवी (वय ५५ वर्षे, रा. मौलीपाडा) या महिलेचा नदीला आलेल्या पुरात बुडून मृत्यू झाला आहे.
अक्कलकुवा तालुक्यात १६५.१३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बऱ्हाणपूर महामार्गावरील अक्कलकुवा-सोरापाडा नदीला जोडणारा पूल जीर्ण झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. पुराच्या पातळीत वाढ झाली असून सोरापाडा येथील नागरिकांना शाळेत आणि मंदिरात स्थलांतर करण्यात आले आहे. अक्कलकुवा येथील मोलगी घाट रस्त्यावरून पूल वाहून गेला आहे.
तळोदा तालुक्यात १४८.९४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील खर्डी नदीला महापूर आला आहे. शहरात रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याची परिस्थिती आहे.
शहादा तालुक्यातही पावसाचा कहर सुरू असून १६६.८८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शहादा शहरासह अनेक गावे जलमय झाली आहेत. तालुक्यातील तापी नदीवरील सारंखेडा बॅरेजमध्ये पुराचे पाण्यात वाढ झाल्याने बॅरेजचे २७ दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. शहादा शहर, वैजाली, डामरखेडा, आवगे, जुनवणे या परिसरातील २०० पेक्षा जास्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.