नंदुरबार - तळोदा येथे शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. व्यापारी संकुलातील ऑटो पार्टस् दुकानासह तीन दुकाने आगीत जळुन खाक झाली. या आगीत पावणेबारा लाखाचे नुकसान झाले आहे. मलिक कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चार दुकानांमध्ये अग्नितांडव झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मदतकार्यासाठी धाव घडली. मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. या मदतकार्यात असिफ मन्यार हे किरकोळ भाजले गेल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच पालिकेच्या अग्निशमक बंबाला पाचारण केल्याने पहाटे तीन वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.
तळोदा शहरातील बद्री कॉलनीत मलिक कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये विविध प्रकारची दुकाने आहेत. दरम्यान, कॉम्प्लेक्समधील मलिक ऑटो पार्ट्सच्या दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण केल्याने लगतच्या आजहर हार्डवेअर दुकानाने पेट घेतला. ही आग येथेच न थांबता शेजारी मोनाली कोल्ड्रींक्स व जुनेद मोबाईल दुकान या दोन्ही दुकानांना आग लागली. या आगीने चारही दुकानांमध्ये रौद्ररुप धारण केल्याने कॉम्लेक्समध्ये अग्नितांडव घडले. दुकानांना आग लागल्याची वार्ता शहरात पसरताच परिसरातील नागरिक व दुकानदारांनी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी मदतकार्य करतांना असिफ मन्यार हे किरकोळ भाजले गेल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अग्नितांडव पाहता आगीवर नियंत्रण मिळविता येत नसल्याने नगरसेवक अमानोद्दीन शेख व सामाजिक कार्यकर्ते रईसअली सैय्यद यांनी लागलीच अग्निशमक बंबास पाचारण केले. पालिका अग्निशमन बंब व नागरिकांच्या मदतकार्याने पहाटे 3 वाजेदरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. दरम्यान सुदैवाने संचारबंदी व मध्यरात्रीची वेळ असल्याने कुठलीही जिवीतहानी घडली नाही. परंतु या आगीत चारही दुकाने जळुन खाक झाल्याने सुमारे 12 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, हेड कॉन्स्टेबल किसन वळवी, हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे, पिंटु अहिरे यांनी घटनास्थळी येवुन नुकसानीची पाहणी केली. तळोदा पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली असून तपास दिलीप जगदाळे व वनसिंग पाडवी करित आहेत.