नंदुरबार - नवापूर तालुक्यातील कोकणीपाडा गावातील अविनाश फुलसिंग कोकणी यांच्या किराणा दुकानात अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. किराणा दुकानावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. आग लागल्याने आदिवासी दुकानदार हवालदिल झाले असून, कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांना रात्री आग लागल्याचे समजल्याने ग्रामस्थाने दुकानाकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती. परंतु पाचवाजेपर्यंत या आगीमुळे दुकानातील पाच लाखांचा माल जळून खाक झाला आहे. दुकानातील फ्रीज, टीव्ही कुलर, इनव्हर्टर, मोबाईल आणि पैशांचा गल्ला संपूर्ण किराणामाल जळून खाक झाला आहे. यासंदर्भात त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनाने शासन स्तरावर उपाय योजना होण्याची अपेक्षा सरपंच, ग्रामस्थांनी व कोकणी कुटुंबाने व्यक्त केली आहे.
दुकानदार कोकणी यांनी होळी असल्याने नुकताच लाखो रुपयांचा किराणा माल भरला होता. दोन दिवसात जाळून खाक झाल्याने लाखांचे नुकसान झाले आहे. महसुल विभागाचे तलाठी अशोक उगणे, ग्रामसेवक काशीराम थवील यांनी घटनास्थळी पाहणी करून दुकान जळल्याचा पंचनामा केला आहे. पंचनामा व भरपाई संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगितले.