नंदुरबार- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माजी आमदार चंद्रकांत रघूवंशी यांनी 15 लाखांचा धनादेश मुंबई येथे सुपुर्द केला. गोरगरीब जनतेला मदत व्हावी, तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी. यासाठी नंदुरबार तालुका विधायक समिती तसेच रघूवंशी कुटुंबियांच्यावतीने 15 लाखांची मदत करण्यात आली.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हाताशी आलेले पीक वाया गेल्याने व राज्यात नवीन सरकार आल्याने राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व त्यांच्या कुटुंबीयांतर्फे सामाजिक बांधीलकीतून ही रक्कम देण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया रघूवंशी यांनी व्यक्त केली. तसेच उध्दव ठाकरे यांनीही निधी मिळाल्यानंतर समाधान व्यक्त केले. राज्यात मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नंदुरबारमधून सहाय्यता निधी दिल्याने इतरांनीही यातून प्रेरणा मिळेल, असा सुर उमटत आहे.
यावेळी सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, उपजिल्हाप्रमुख देवेंद्र जैन उपस्थित होते.