नंदुरबार- आपण भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आदेशाने राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची माहिती माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली. त्याचबरोबर एकनाथ खडसे देखील घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती पाडवी यांनी दिली.
माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते म्हणाले की मी भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला राष्ट्रवादी जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
त्यानंतर उदेसिंग पाडवी म्हणाले की, एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असून त्यांना राष्ट्रवादीत योग्य मानसन्मान मिळणार आहे. त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे. तसेच खडसे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात ही स्थान मिळणार असल्याचे पाडवी यांनी सांगितले.