नंदुरबार - विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी नंदुरबार-अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला.
डाब, काठी, मोलगी, अक्राणी आणि सुखाणी, अशा दुर्गम भागातील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. त्यांनी अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर या सर्व महिला कर्मचारी संचलित मतदान केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. तसेच दिव्यांग मतदारांसाठी असणाऱ्या व्हिलचेअर्सचीदेखील त्यांनी पाहणी केली.
यावेळी विभागीय आयुक्त माने यांनी मतदार आणि दिव्यांग मतदारांना मदत करण्याचे नागरिकांना आवाहन केले. पोलीस पाटील यांनी दिव्यांग मतदारांचे मतदान सुलभतेने होण्यासाठी सहकार्य करावे. कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांच्या ठिकाणी महिला मतदारांना सहकार्य करावे आणि मतदारांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहन सुविधा आणि आवश्यकतेनुसार व्हिलचेअर उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.