नंदुरबार - लॉकडाऊन आणि संचार बंदी काळात पुण्यात आडकून पडलेला मजुरांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने बसेसने त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येत होते. याच दरम्यान एका गर्भवती महिलेला प्रवासादरम्यान अचानक कळा प्रसूती कळा सुरु झाल्यामुळे तिला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. तसेच तिला प्रसूती झाल्यानंतर सुखरूप घरीही पाठवण्यात आले.
लॉकडाऊनचा फटका अनेक स्थलांतरित मजुरांना बसला आहे. पुणे येथे अडकलेल्या एका दाम्पत्याला खिशातले पैसे संपले, पत्नी गर्भवती, बाहेर लॉकडाऊन, अशा परिस्थितीत करायचे तरी काय? असा प्रश्न पडला होता. त्यानंतर या दाम्पत्याने नंदुरबार येथील आदिवासी विकास विभागाशी संपर्क साधला. तसेच आपल्या मूळी गावी सोडण्याची विनंती केली. त्यानंतर आदिवासी विकास विभागातर्फे त्यांची जिल्ह्यात परत पाठवण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली.
या दाम्पत्याची आरोग्य तपासणी करून बसद्वारे नंदुरबार जिल्ह्यात परत आणण्याचा प्रवास सुरू झाला. या काळात अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा गर्भवती महिलेला प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. दाम्पत्य घाबरून गेले दरम्यान, सोबत असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला प्रसूतीसाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
प्रसूती सुखरूप झाल्यानंतर महिलेला आदिवासी विकास विभागाच्या अटल रुग्णवाहिकेतून अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगारा पुनर्वसन येथे पोहचवण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाय योजनेतून लॉकडाऊनच्या काळात पुण्याहून गावापर्यंत पोचविण्याचे काम करण्यात आल्याने महिलेच्या परिवाराने आदिवासी विकास विभागाचे आभार मानले आहेत.