नंदुरबार- कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी नंदुरबार जिल्ह्यात 31 मार्च ते 15 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत पूर्णतः संचारबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. त्याचबरोबर बससेवादेखील बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात बाजारपेठा, आठवडे बाजार, इतर अत्यावश्यक नसलेले दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, सलुन दुकान, ब्युटी पार्लर पूर्णतः 15 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत. करमणूक उद्याने, सिनेमागृहे, नाट्यमंदिरात व्यायाम शाळा जलतरण तलाव, क्रीडा संकुल, मंगल कार्यालय, लॉन्स, सभागृह हेदेखील बंद राहणार आहेत. त्याचबरोबर सर्व हॉटेल, लॉजिंग, परमिट रूम, बियर बार व इतर प्रकारचे आस्थापनेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम बंदरातील धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहेत. तथापि धर्मगुरू पुजारी यांना नित्य नियमाने धार्मिक कार्यक्रम करता येण्याची परवानगी असणार आहे.
हेही वाचा-मुंबईत शुक्रवारी 40 हजार 360 लाभार्थ्यांचे लसीकरण
नियमांचे नागरिकांनी पालन करावे - जिल्हाधिकारी
सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून औषधाची दुकाने व रुग्णालय पूर्णवेळ सुरू राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. भाजीमंडई सकाळी सहा ते अकरा या वेळेत सुरुवातील मात्र शारीरिक अंतर ठेवून भाजीपाला विक्री करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले की, भाजीपाला आणि किराणा वस्तू घरपोच सेवा देण्यास प्राधान्य देण्यात यावे. दूध वितरकांना सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत दूध वितरणात परवानगी असणार आहे. दूध वितरकांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र घेणे आवश्यक राहणार आहे. किराणा आस्थापने सकाळी सहा ते अकरा या वेळेत पाच पेक्षा अधिक व्यक्ती दुकानात आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करून दुकान सील केली जाणार आहे. दुकानाच्या प्रदर्शनी भागात 'मास्क नाही तर प्रवेश नाही' असे बोर्ड लावावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी खुणा कराव्यात. सर्व प्रकारचे माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. गॅस वितरण पूर्ण वेळ सुरू राहणार आहे. पेट्रोल पंप हे केवळ अत्यावश्यक सेवा व सरकारी वाहनासाठी सुरू राहणार आहे. यासाठी आवश्यक ते पुरावे संबंधित वितराकास दाखविणे आवश्यक असणार आहे.
हेही वाचा-Live Updates : राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी
धार्मिक कार्यक्रमात 20 पेक्षाअधिक नागरिकांना परवानगी नाही
संचारबंदीच्या काळात धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. सर्व सरकारी कार्यालय, बँक, सरकारी वेळेनुसार सुरू राहणार आहेत. पोलीस, होमगार्ड, सूचना केंद्र, महावितरण कार्यालय, सशस्त्र दले, अग्निशामन दल, शासकीय धान्य गोडाऊन, नगरपालिका कोणत्याही बंधनाशिवाय सुरू राहणार. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.
शाळा व महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक व कोचिंग संस्था वसतीगृह हे प्रशिक्षण संस्था 27 मार्चपासून तर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. ऑनलाइन शिक्षणाची जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी परवानगी दिली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा जिल्हाधिकाऱ्यांनी इशाराही दिला आहे.