नंदुरबार - कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधीत क्षेत्रात कोणतेही दुकाने सुरू ठेवण्यास नकार दिला आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत प्रतिबंधीत परिसरातील व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्यांच्यावर महसूल विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील गणपती मंदीर, अहिल्याबाई विहीर, कांचन हॉटेल, जुनी जनता बँक, कुंभारवाडा, सोनार खुंट इत्यादी प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणीही फिरणार नसल्याचे आदेश दिले होते. त्यासह पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील दुकाने सुरु ठेवणार नाही, असे आपत्ती व्यवस्थापन व कोविड-19 संदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत परिसरातील व्यवसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला.
नागरिकामंध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असे माहिती असताना देखील दुकाने सुरू ठेऊन प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत महसूल, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, नंदुरबार शहर पोलीस यांचे संयुक्त कारवाईत दुकाने सुरू असल्याचे दिसून आले होते.
या कारवाईत बॉम्बे ट्रेडर्स, ओम शांती मॅचिंग, आनंद गिफ्ट हाऊस, मोदी हॅण्डलूम, अंबर मॅचिंग, अरीहंत कलेक्शन, सिध्दार्थ सिलेक्शन, कुशल कलेक्शन, बालाजी साडी आणि जगदंबा कलेक्शन असे दुकाने ‘प्रतिबंधीत क्षेत्रात सुरू असल्याचे आढळून आले होते. त्यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि क. 188, 268, 269, 290, 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. ए. विराणी, यांच्या कोर्टात हजर केल्याने प्रत्येकी रुपये 2000 दंड असा एकूण रुपये 42000 दंड तसेच दंड न भरल्यास 5 दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.