नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बागायती कापसाची लागवड केली जाते.ही लागवड मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात करण्यात येते. शेतकऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण करुन कापसाच्या लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई भासत असल्याचे चित्र आहे. शारीरिक अंतराचे पालन करत योग्य ती खबरदारी घेत शेतकऱ्यांनी उपलब्ध मजुरांच्या मदतीने कापूस लागवड केलीय. आता त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील मुख्य पिकांपैकी कापूस एक पीक आहे. जिल्ह्यात जवळपास 25 ते 30 हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. कापसाची लागवड ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण करावी लागते. मे महिन्यात लावलेल्या कापसाचे उत्पन्न भरपूर व चांगल्या प्रमाणावर येत असल्यामुळे शेतकरी मे महिन्याच्या कडक उन्हात कापसाची लागवड करतात.
मे महिन्याच्या अखेरीस लागवड केलेल्या कापूस पिकाला वाढीसाठी जून महिन्यात होणारा पाऊस गरजेचा असतो. हा पाऊस वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांना विहिरीच्या पाण्याचा वापर करावा लागतो व कापसाला जिवंत ठेवावे लागते हे मोठे जिकरीचे असते.
यावर्षी सर्वत्र कोरोनाच्या संदर्भात असलेली भीती आणि वाढत्या तपमानामुळे मजूर उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली. मात्र, मिळेल त्या मजुरांच्या मदतीने कापसाची लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांच्या कडून योग्य ती काळजी घेत योग्य सुरक्षित अंतर ठेवत लागवड केली. कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांसमोर बियाणे खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांची भीती देखील शेतकऱ्यांच्या मनात असल्यामुळे बियाणे खरेदी करताना त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कापसाची लागवड केली गेली.