नंदुरबार - भरधाव ट्रकने चिरडल्याने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अपघाता गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान सहचालकाचा मृत्यू झाला. भराधाव ट्रक नंदुरबार - धुळे रस्त्यावरील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला धडकल्याने प्रवेशद्वाराचे नुकसान झाले. या प्रकरणी ट्रक चालकाविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील गवळीवाडा भागात राहणारे भटु मोतीराम चौधरी (वय 60 वर्ष) हे महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नेहमीप्रमाणे भटु चौधरी हे सकाळी 6 च्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी धुळे रस्त्याकडे गेले होते. यावेळी भरधाव वेगात येणार्या ट्रकने (क्र.एम.एच.20 ई.जी.5655) धडक दिल्यामुळे भटु मोतीराम चौधरी यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. ट्रक वेगात असल्याने चौधरी यांना चिरडुन रस्त्यालगतच्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकला. यात महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाले आहे.
गंभीर जखमी झालेले भटु मोतीराम चौधरी यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यावर डॉ.प्रविण सोनविलकर यांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात ट्रकमधील सहचालक सुभाष पोपट शेरे (वय 28, रा.वैजापुर, जि.औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असतांना सहचालकाचा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करुन नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. अपघात घडताच ट्रक चालक पसार झाला आहे. ही घटना सकाळी 6 च्या सुमारास धुळे रस्त्यावरील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. याबाबत कांतीलाल मोतीलाल चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार ट्रक चालकाविरुध्द कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, 184, 134/187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत.