नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिरची लागवड केली जाते. मात्र, यावर्षी लॉकडाऊनच्या काळात मिरचीचे रोप मिळत नसल्याने लागवडीला उशिर झाला आहे. त्यासोबत लॉकडाऊनच्या काळात शेतकर्यांचे आर्थिक गणित चुकल्याने आणि मजूर उपलब्ध होत नसल्याने यावर्षी मिरची लागवडीला उशिरा सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी मिरचीचे क्षेत्र वाढणार असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. मिरचीचे रोप मिळण्यात अडचणी येत असल्याने काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातच मिरचीचे रोप तयार करण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिरची लागवड पूर्ण झाली होती. मात्र, यंदा दोन आठवडे उशिर होऊनही लागवडीला सुरुवात झालेली नाही.