नंदुरबार - राज्यातील प्रमुख मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. अनेक वर्षांपासून मिरचीला मिळणारा कमी भाव आणि मिरचीच्या पिकावर पडणाऱ्या विषाणूजन्य रोगाचे संकट आहे. हे संकट असतानाही यावर्षीही शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे मोठा कल आहे. मात्र, योग्य दर मिळत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी आडचणीत सापडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेतले जात असते. दरवर्षी विषाणूजन्य रोगांचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी विषाणू फ्री असल्याचा दावा करणाऱ्या मिरची वाणाची निवड केली. रोपवाटिकेतून रोपे खरेदी केली. मात्र तरीही यावर्षी मिरचीवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यातच, फवारणी व इतर खर्चामुळे उत्पादन खर्च वाढला असल्याचे शेतकरी सांगतात.
पावसाळ्यात हिरवी मिरची बाजारात विक्रीसाठी आणतात. मात्र, भाजीपाला किरकोळ विक्रेते ग्राहकाला ६० ते ८० रुपये प्रति किलोप्रमाणे हिरव्या मिरची विक्री करत असतात. तर, शेतकऱ्यांकडून १५ ते १८ रुपये किलोने मिरची खरेदी केली जात आसते. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकरी सांगतात. मिरची उत्पादक शेतकरी दरवर्षी भावात नाडला जात आहे. त्याच सोबत विविध विषाणूंचा प्रादुर्भाव या बाबतीत संशोधन होऊन शासनाने काहीतरी धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.