नंदुरबार - जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सलग तीन दिवस बंद असल्याने शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात बाजार समिती एक दिवस बंद होती. तर दुसऱ्या दिवशी गणपती स्थापना, लगेच रविवार तर सोमवारी जिल्ह्यातील व्यापारी संघटनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजार समितीत माल खरेदी आणि विक्रीचा खर्च कमी करावा, त्याच सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी असलेल्या जाचक नियम सुटसुटीत करावेत आदी मागण्यांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील बाजार समिती एका दिवसासाठी बंद असेल, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोर वाणी यांनी दिली आहे.
लागोपाठ चार दिवस बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांसमोरील समस्या वाढली असून त्यांना आपला शेती माल विक्रीसाठी समस्यांना समोर जावे लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक कारणांवरून नेहमीच बंद होत असते. कधी व्यापाऱ्यांचा, कधी हमालांचा तर कधी मापाडींचा संप पुकारला जातो. मात्र यात नेहमी शेतकऱ्यांचे नुकसान होते.