नंदुरबार- एकीकडे खासगी मोबाईल कंपन्या विविध ऑफर्स बाजारात आणत असताना भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल मात्र डबघाईला जाताना दिसत आहे. शहादा तालुक्यातील वडाळी, सारंगखेडा, तोरखेडा परिसरात बीएसएनएलचे टॉवर उभे असून हे टॉवर रेंज अभावी कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरातील बहुतेक ग्राहक हे नॉट रिचेबल येत असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. उभे असलेले टॉवर केवळ शोपीस म्हणून उभे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे याठिकाणी बीएसएनएल टॉवर असून नसल्या सारखे झाले आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता महावितरणचे लाखोंचे लाईट बिल भरले नसल्याकारणाने संबंधित बीएसएनएल टॉवरचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे समजते, यामुळे परिसरातील बँक, पोस्ट ऑफिस, सेतू सुविधा केंद्र, कंप्यूटर सेंटर, ग्राम पंचायत कार्यालय, खाजगी इंटरनेट सेवा बंद असून परिसरातील बहुतांश खेड्याचा संपर्क तुटला आहे.
इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडीत झाल्याने भरपूर कामे लटकली आहे. यात पोस्ट खात्यातील महिना अखेर आर.डी, एफडी भरणा, लाईट बिल भरणा, सेतु केंद्रातील ऑनलाईन दाखले, आधार अपडेट, नुकतेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिले जाणारे दाखले यासह अनेक कागदपत्रे मिळणे थांबले आहे. संबंधित सेतु चालकांसह, ग्राहकांनी याबाबत नाराजी व्यक्त करतांना बीएसएनएलने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्राहकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी केली आहे. बीएसएनएल कंपनी ग्राहकांकडून बिलाचे पैसे वसूल करूनही सेवा देत नाही. केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या बी.एस.एन.एल कंपनीवर मोदी सरकारचे लक्षच नाही हेच सध्यातरी दिसून येत आहे.