नंदुरबार - उपजिल्हा रुग्णालय, नवापूर व रक्तपेढी जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन सारिका वाघरी नामक गरोदर मातेच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण 42 जणांनी रक्तदान केले.
वैद्यकीय अधिक्षक डॉ.कीर्तीलता वसावे यांनी माहिती देताना सांगितले, की रुग्णालयात प्रसूती व सीजरसाठी येणाऱ्या माता सिकलसेल ग्रस्त रुग्ण असतात. त्यामुळे त्यांना रक्ताची गरज असते. यासाठी रक्तपुरवठा केंद्रामार्फत आवश्यक रक्ताचा पुरवठा करण्यासाठी वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
रक्तदान केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही, त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन देखील यावेळी डॉक्टरांनी केले. समुपदेशक कैलास माळी यांनी एचआयव्ही एड्स, सिकलसेल सारख्या आवश्यक चाचण्याविषयी माहिती दिली. रक्तदानाचे महत्व पटवून सांगितले. रक्तदात्यांना प्रवृत्त करण्यासाठी शिबिराचे प्रचारक बजरंग भंडारी आणि लाजरस गावित यांनी विशेष परिश्रम घेतले.
नवापूर शहरातील विविध सामाजिकसंस्था कार्यकर्ते, नागरिक, रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.