नंदुरबार - परराज्यात विक्रीसाठी असणारा व महाराष्ट्रात प्रतिबंध घालण्यात आलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. तीन वाहनांमधून या मद्यसाठ्याची वाहतूक करण्यात येत होती. अक्कलकुवा तालुक्यातून हा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये तीन वाहनांसह 66 लाख 48 हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्याची राज्यात मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. त्यामुळे मद्यतस्करांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देखील विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. अक्कलकुवा तालुक्यात अशाचप्रकारे दोन ठिकाणी कारवाई करून, दोन गुन्ह्यांमध्ये तीन वाहनांसह 66 लाख 48 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
चारचाकीसह दोन कंटेनर जप्त
खापर ते सागबारा रस्त्याने जाणार्या स्कॉर्पिओ गाडी (क्र.जी.जे.06 सी.एम.5407) या वाहनाची मोरंबा फाट्याजवळ भरारी पथकाने तपासणी केली असता, त्यात परराज्यातील विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे 20 खोके आढळून आले. यावेळी पोलीसांनी दोन संशयितांना अटक करून मद्यसाठा व वाहनासह एकुण 6 लाख 41 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दुसऱ्या घटनेमध्ये अक्कलकुवा ते खापर रस्त्याने जाणार्या दोन कंटेनरमध्ये देखील मोठा मद्यसाठा आढळून आला आहे. भरारी पथकाने या कंटेनरसह 7 लाख 6 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.