नंदुरबार - अक्षय तृतीयेला दगड उचलून सालदार ठरविण्याची परंपरा कालबाह्य होत आहे. मात्र यावर्षी लॉकडाऊनमध्येदेखील अक्षय तृतीयेनिमित्त नंदुरबार शहरातील माळीवाड्यात सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन दगड उचलून ही परंपरा कायम ठेवण्यात आली. तसेच घरोघरी घागरींचे पूजन करुन पुर्वजांना आमरस पुरणपोळीचे नैवैद्य दाखविण्यात आले.
नंदुरबार शहरातील माळीवाड्यात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी दगड उचलून सालदार ठरविण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा कालबाह्य होत आहे. दरम्यान अक्षय तृतीयेनिमित्त दिवसभर शहरातील माळीवाडा भागात दोन जणांमध्ये दगड उचलण्याची स्पर्धा रंगली. या दगडांचे वजन किमान 90 ते 120 किलो आहे. जो व्यक्ती या दगडांना उचलेल त्याला बळीराजा आपल्या घरी सालदार म्हणून वर्षभरासाठी कामाला ठेवेल. तसेच या सालदारांची वर्षभराची रक्कमही याच दिवशी ठरवली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेतला गेला. यावेळी उपस्थितांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन तोंडाला मास्क लावले होते.