नंदुरबार - मका व तुरी पिकाच्या शेतात अफुची शेती केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस दलाला मिळाली होती. यावरुन, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने छापा टाकुन सुमारे दोन शेतांमधील 505 किलो वजनाची लागवड केलेल्या अफुची बोंडे जप्त करण्यात आली. तसेच ही अफुची शेती उध्दवस्त केली. ही कारवाई नंदुरबार तालुक्यातील अक्राळे येथे करण्यात आली. एकूण 10 लाख 15 हजार रुपये किंमतीची अफुची झाडे जप्त केली आहे. दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आक्राळ्यात मका, तुरीच्या शेतात अफुची शेती -
नंदुरबार तालुक्यातील अक्राळे गावाच्या शिवारात एका शेतात मका व तुरी पिकाच्या आडोश्याला अफुची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने पोलिसांनी अक्राळे शिवारातील शेतात छापा टाकला. याठिकाणी मका व तुरी पिकाच्या आडोश्याला गुंगीकारक अफुच्या झाडांची बेकादेशीररित्या लागवड केल्याचे दिसुन आले. तसेच त्या लगतच्या शेतात अफुची लागवड केल्याचे आढळुन आले.
505 किलो वजनाची 10 लाख 15 हजार रुपये किंमतीची झाडे -
याठिकाणाहून एकूण 505 किलो वजनाची 10 लाख 15 हजार रुपये किंमतीची झाडे जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी, शेतमालक ज्ञानेश्वर जगन धनगर, कृष्णा गोबा धनगर (दोघे रा. रजाळे ता.नंदुरबार) यांच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट कलम 15 (क), 17 (क), 18 (क), 20 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील शेतमालक ज्ञानेश्वर धनगर यास अटक करण्यात आली. तर दुसरा संशयित फरार झाला आहे.
हेही वाचा - एलपीजी गॅसमध्ये आणखी २५ रुपयांची दरवाढ; एका महिन्यांदा चौथ्यांदा महागाईचा चटका
या पथकाने केली कारवाई -
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, हेकॉ.रविंद्र पाडवी, पोना.राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सामुद्रे, ज्ञानेश्वर पाटील यांच्या पथकाने केली.