नंदुरबार- तोरणमाळहून खडकी पॉईंट येथून सिंधी येथे जाताना क्रुझर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी क्रुझर गाडीला अपघात झाला. या अपघातात पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्तांना दरीतून बाहेर काढण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
![accident toranmal cruiser crashes](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-01-toranmal-accident-mh10020_18072021190354_1807f_1626615234_833.jpg)
रविवारी सायंकाळच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेऊन जात होती. अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे. क्रुझर दरीत कोसळण्यापूर्वी प्रवाशांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे
![accident toranmal cruiser crashes](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-01-toranmal-accident-mh10020_18072021190354_1807f_1626615234_75.jpg)
सहा महिन्यात दुसरा सर्वात मोठा अपघात -
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळ सोबत जोडला गेला आहे. मात्र असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यात या रस्त्यावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. पोलीस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य सुरू असून जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालयातून पोलीस अधीक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाने अद्यापही कुठलीही माहिती दिली नसून याठिकाणी संपर्क यंत्रणा नसल्यानेच माहिती मिळण्यात देखील अडसर निर्माण होत आहे.
![accident toranmal cruiser crashes](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-01-toranmal-accident-mh10020_18072021190354_1807f_1626615234_961.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत केली जाहीर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 'महाराष्ट्रातील नंदुरबारमधून एक दुःखद बातमी आहे. अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल सहवेदना व जखमींसाठी प्रार्थना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाख सानुग्रह मदत तर, जखमींना 50,000 रुपये दिले जाणार, असल्याचे मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.