नंदुरबार - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री अनिकेत ओव्हाड यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगाव तालुक्यातील बिलगाव येथील धबधब्यावर घडली. अनिकेत ओव्हाड दोन दिवसांपूर्वीच मुंबईहून नंदुरबार जिल्हा आले होते.
कुर्ला येथील रहिवासी असलेले अनिकेत गौतम ओव्हाड (वर ३०) हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री या पदावर कार्यरत आहेत. ओव्हाड हे मुंबईहून काही कार्यक्रमानिमित्त नंदुरबार जिल्हा दौर्यावर आले होते. त्यांच्यासोबत चार ते पाच पदाधिकारी होते. अनिकेत ओव्हाड हे असली येथील एका मित्राकडे मुक्कामी होते.
धबधबा पाहण्याच्या मोहात गेला जीव -
सातपुड्याच्या नर्मदाकाठावर धडगांव तालुक्यात बिलगांव येथे मोठा धबधबा आहे. याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पाहण्यासाठी अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री अनिकेत ओव्हाड हे मित्रांसोबत गेले होते. याठिकाणी पाय घसरल्याने अनिकेत ओव्हाड पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी दोघांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, अनिकेत खोल डोहात ओढले गेल्याने मृत्यू झाला. तर त्यांचे मित्र थोडक्यात बचावले.
कार्यकर्त्यांची धडगावकडे धाव -
ही घटना दुर्गम भागात घडली असून नंदुरबारातील अभाविपच्या कार्यकर्त्यांना उशिराने माहिती मिळाली. यावेळी माहिती मिळताच कार्यकर्ते धडगांवकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांचे शव ताब्यात घेऊन मुंबईला पाठविण्याची व्यवस्था पदाधिकार्यांनी केली. अनिकेत ओव्हाड हे अभाविपचे धडाडीचे कार्यकर्ते होते. तसेच ते त्यांच्या कुटुंबातील एकुलते एक सुपूत्र होते.
दोन दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांना केले होते मार्गदर्शन -
गेल्या दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय महामंत्री अनिकेत ओव्हाड नंदुरबार येथे येत असल्याची कार्यकर्त्यांना माहिती मिळाली होती. त्यावेळी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले होते.