नंदुरबार - भरधाव ट्रकने सात गायींना धडक दिल्याची घटना घडली. नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन गर्भवती गायींचा मृत्यू झाला असून ५ गायी जखमी झाल्या आहेत. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाला आहे. याबाबत अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लगत मोकाट जनावरे बसलेली असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात वाहनाची चाके दोन गायींच्या पायावरून गेल्याने त्यांची जायबंदी झाली, तर वाहनाच्या समोरील भाग धडकल्याने तीन गायींच्या मानेचा भाग चिरला.
पोलीस कर्मचारी व युवकांकडून मदत
यावेळी महामार्गावर जखमी अवस्थेत जनावरे पडलेली दिसताच परिसरातील युवकांनी घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना दिली. अपघातामुळे रस्त्यावर पडलेल्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या युवकांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या गायींना रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. जखमी गायींना विसरवाडी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. वैद्यकीय कर्मचारी राठोड यांनी जखमी गायींवर औषधोपचार केले. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात आमीन बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नंदुरबार : आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान