मुंबई - राज्यातील कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आरोग्य सुविधेच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढे आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील नंदुरबार रेल्वे स्थानकावर आयसोलेशन कोचचा वापर सुरू झाला आहे. आतापर्यंत रेल्वेच्या आयसोलेशन कोचममध्ये 97 कोविड रुग्णांना दाखल केले आहे.
66 रूग्णांना डिस्चार्ज
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सौम्य कोरोना असलेल्या रुग्णांसाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या भागात कोविड केअर सेंटर नाही किंवा त्यांची संख्या कमी आहे. अशा भागात रेल्वेचे आयसोलेशन कोच उपयुक्त ठरत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण 128 आयसोलेशन कोच तयार करण्यात आले आहेत. या पैकी 21 कोचचा वापर नंदुरबार रेल्वे स्थानकात 18 एप्रिलपासून सुरू झाला आहे. एका आठवड्यात नंदुरबारच्या आयसोलेशन कोचमध्ये एकूण 54 रूग्ण दाखल झाले. तर, आतापर्यंत एकूण 97 कोविड रुग्ण झाले. यापैकी 66 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला असून 31 जण सध्या आयसोलेशन कोचमध्ये आहेत.
कोचमध्ये 336 खाटा, कुलरही
नंदुरबार स्थानकांवर एकूण 21 आयसोलेशन कोच आहेत. प्रत्येक कोचमध्ये 16 खाटा आहेत. त्यानुसार 21 कोचमध्ये एकूण 336 खाटा उपलब्ध आहेत. प्रत्येक रुग्णासाठी प्रत्येकी एक बेड रोल, उशी, नॅपकीन, कचऱ्याचा डबा ठेवण्यात आलेला आहे. एका डब्यात 9 कुलर आहेत. डब्यात थंडावा राहण्यासाठी रेल्वेच्या डब्यात गोणपाट अंथरण्यात आले आहे. यात पंखा, विद्युत दिव्यांची सोय आहे. एका डब्यात दोन ऑक्सिजन सिलेंडर; एका डब्यात एक स्नानगृह, तीन शौचालयांची सुविधा पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा - सुरेश रैनाने मुख्यमंत्री योगींकडे मागितले ऑक्सिजन सिलिंडर; सोनू सूदने दिले उत्तर
हेही वाचा - सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, 'तिच्या' 3 वर्षांच्या मुलाचा केला खून