नंदुरबार - शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सोमवारी 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर व एका सोनोग्राफी सेंटरमधील कंम्पाऊंडरचा समावेश आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 269 वर पोहचली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा व सर्वच विभाग प्रयत्न करत आहेत. नंदुरबार शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक रविवारी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही दिवसेंदिवस पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहेत. गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात दररोज दहापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. काल पुन्हा 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नंदुरबार शहरातील 7 तर शहाद्यातील दोन जणांचा समावेश आहे.
नंदुरबार येथील तलाठी कॉलनीत 1, गवळीवाड्यात 1, रघुवंशी नगरात 1, वर्धमान नगरात 1, विमल हौसिंग सोसायटीत 1, भाटगल्लीत 1 व चौधरी गल्लीत 1 जणाला कोरोनाची लागण झाली आहे. शहादा येथील दादावाडी कॉलनीत व गरीब नवाज कॉलनीत दोन 70 वर्षीय वृद्धांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. वरील रुग्णांमध्ये नंदुरबार येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर व एका सोनोग्राफी सेंटरमधील कंम्पाऊंडरचा समावेश आहे. डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तसेच रुग्ण राहत असलेल्या परिसरांचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले.
नंदुरबारमधील एकूण 168 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.