नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या 70 वर्षीय वृध्दाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहचली आहे. मृत वृध्द हा मानसिक रोगी असल्याने तो अनेकांच्या संपर्कात आल्याची भीती आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा प्रशासन आणि आरोग्य विभाग शोध घेत आहे.
१५ जूनला नंदुरबार शहरासह जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे 6 रूग्ण आढळून आले होते. नंदुरबार शहरातील तीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बागवान गल्लीतील एका 70 वर्षीय वृध्दाचा समावेश होता. हा वृध्द मानसिक रोगी असल्याने त्याचा साक्रीनाका परिसर ते गाझीनगरापर्यंत संचार होता. हा वृद्ध बाधित असल्याचे समोर आल्यानंतर त्याला नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 68 वर पोहचली असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 रूग्ण उपचार घेत आहेत तर 33 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 58 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून अद्याप 74 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.