नंदुरबार - जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव या ६ पंचायत समितींसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकींकरता एकूण २२५ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात एकूण ३६९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ गटातील ३९५ उमेदवारांपैकी १७० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात २२५ उमेदवार आहेत. तसेच ६ पंचायत समितींच्या ११२ गणांतील ६१४ उमेदवारांपैकी २४५ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने ३६९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे गट व गण मिळून एकूण ४१५ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली असल्याने आता जि.प. गट व पं.स. गणातील निवडणुकीच्या रिंगणात ५९४ उमेदवारांमध्ये लढती रंगणार आहेत. तर, शहादा पंचायत समितीच्या लोणखेडा गणात एकच अर्ज शिल्लक राहिल्याने भाजपच्या उमेदवार बायजाबाई प्रताप भिल यांची बिनविरोध निवड झाला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील १० गटांसाठी निवडणुकीच्या रिंगणात ३९ उमेदवारांचे ३९ अर्ज शिल्लक राहिले आहेत. अक्राणी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांसाठी या तालुक्यात आता ३० उमेदवारांचे ४० अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर, तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी आता निवडणूक रिंगणात २६ उमेदवारांचे २७ अर्ज आहेत. शहादा तालुक्यातील १४ गटांसाठी निवडणूक रिंगणात 64 उमेदवारांचे 85 अर्ज शिल्लक आहेत. नंदुरबार तालुक्यातील १० गटांसाठी ३७ उमेदवारांचे ५५ अर्ज शिल्लक राहिले आहेत.
नवापूर तालुक्यातील १० गटांसाठी निवडणूक रिंगणात २९ उमेदवारांचे ३७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. यानुसार जिल्ह्याभरात जिल्हा परिषदेच्या ५६ गटांमधून निवडणूक रिंगणात २२५ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावित आहेत. पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात जिल्ह्यातील ६ पंचायत समितींच्या ११२ गणांतील निवडणुकीच्या रिंगणात ३६९ उमेदवारांचे ४३८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. यात अक्कलकुवा तालुक्यातील २० गणांसाठी निवडणुकीच्या रिंगणात ७३ उमेदवारांचे ७३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. अक्राणी तालुक्यातील १४ गणांसाठी निवडणुकीच्या रिंगणात ५० उमेदवारांचे ६० अर्ज शिल्लक राहिले आहेत. तळोदा तालुक्यातील १० गणांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आता ३९ उमेदवारांचे ४३ अर्ज शिल्लक आहेत. शहादा तालुक्यातील २८ गणांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आता ९७ उमेदवारांचे ११९ अर्ज शिल्लक आहेत.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींसाठी एकूण 1145 नामांकन अर्ज दाखल
नंदुरबार तालुक्यातील २० गणांसाठी निवडणूक रिंगणात आता ५५ उमेदवारांचे ८० अर्ज शिल्लक आहेत. नवापूर तालुक्यातील २० गणांसाठी निवडणुकीच्या रिंगणात ५५ उमेदवारांचे ६३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. यानुसार जिल्ह्यातील ६ पंचायत समितींच्या ११२ गणांतून २४५ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ३६९ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावित आहेत. काही ठिकाणी माघारीपूर्वी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अनेक अपक्ष उमेदवारांची माघारी घेण्यासाठी मनधरणी केली. परंतु, काही ठिकाणी अपक्षांनी माघार घेतली तर काही ठिकाणी अपक्षांची उमेदवारी कायम असल्याने राजकीय पक्षांसाठी अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरणार आहेत.
7 जानेवारीला मतदान तर 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा खर्या अर्थाने उडणार असून अनेक गट व गणांमध्ये दुहेरी, तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढती चुरशीच्या होणार आहेत. प्रतिष्ठीत असलेल्या गट व गणांमध्ये नेत्यांची चांगलीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये भाजप-राष्ट्रवादीची छुपी आघाडी? नवीन समिकरणांच्या उदयामुळे समान्य कार्यकर्ते संभ्रमात