नंदुरबार - गावठी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सुमारे 15 लाख 69 हजार रोख रक्कम पळविल्याची घटना गणपती मंदिर परिसरात घडली आहे. सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी संशयीत नोकरासह त्याच्या अन्य तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणपती मंदीराच्या मागील बाजूस देवेंद्र जैन व हितेंद्र जैन यांच डी. सी. डेव्हलपर्स नावाने प्लॉट खरेदी विक्रीचे कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान कार्यालयातील कर्मचारी साफसफाई करीत होता. याच वेळी कार्यालयात दोन सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून त्याल कर्मचार्याला मारहाण करीत बांधून ठेवले व टेबलच्या ड्रावरमधून 15 लाख 69 हजार रोख रक्कम काढून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेद्र पंडित, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी कार्यालयातील तसेच परिसरातील दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन दरोडेखोर कार्यालयात घुसून नोकरासोबत झटापट करताना दिसून आले आहेत. त्यातील एक जण गावठी बंदुक दाखवित असल्याचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. एकंदरीत या दरोड्यात कार्यालयातील कर्मचार्याचा समावेश आहे का या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असून त्याला पुष्टी देखील मिळाली आहे. कार्यालयातील नोकर उमेदसिंग यांनीच संगनमत करुन साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकला असल्याची तक्रार देवेंद्र जैन यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार नोकर उमेदसिंग तसेच त्याचे साथीदार विक्रमसिंग, भगतसिंग उर्फ भगु यांच्यासह अन्य दोन अशा चार जणांविरुध्द भादंवि कलम 394, 120 (ब), 342, 380,23, 323, 34 भारतीय हत्यार कायदा कलम व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर करीत आहेत.