नंदूरबार - दिवसेंदिवस नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात पुन्हा 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच बुधवारी मृत्यू झालेल्या गुरुनानक सोसायटीतील 72 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच मृतांची संख्या 16 झाली आहे.
10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 322 झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून, नंदूरबार शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नंदूरबार व शहादा शहरात आढळून येत आहेत.
नंदूरबार येथील गुरुनानक सोसायटीतील 72 वर्षीय पुरुषाचा बुधुवारी (15 जुलै) मृत्यू झाल्यानंतर काल सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. अहवाल येताच प्रशासनाने त्यांच्या वास्तव्याचा परिसर कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित केला. तसेच परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली जात असून, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्यासाठी आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे.
जिल्ह्यात 184 जण संसर्गमुक्त झाले असून 112 जणांवर उपचार सरू आहेत. नंदुरबार शहर व तालुक्यात बाधितांचा आकडा 216 वर पोहोचला असून 116 रुग्ण संसर्गमुक्त तर सद्यस्थितीत 79 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच शहादा शहरासह तालुक्यात 65 रुग्णांपैकी 33 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 28 रुग्ण उपचार घेत आहेत.