नांदेड - जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर जिल्हा परिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर आज मुदखेड दौऱ्यावर होत्या. यावेळी त्या मुगट गावात आल्या असतांना, आपल्या घराच्या बाहेर अभ्यास करत असलेल्या दोन मुलींना भेटण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी या मुलींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
मुगट गावातील आरोग्य केंद्राची पाहणी करून परतत असतांना त्यांनी एका घरासमोर गाडी थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरत त्यांनी दरवाजात अभ्यास करत असलेल्या दोन मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारुन त्यांचे भावविश्व जाणून घेतले. यातील एकीचे नाव पुष्पा ज्ञानेश्वर कदम तर दुसरी दिपिका रामकिशन कदम. पुष्पा दहावीत तर दिपिका चौथीत शिकत आहे.
या दोन्ही मुलींचे आईवडिल शेती करतात. शाळा कोविड-19 मुळे बंद असल्यामुळे या बहिणींची शाळा दररोज सकाळी घराच्या ओसरीवर सुरु होते. यातील एक दहावीत शिकत आहे तर दुसरी चौथीत शिकते. घरी तिच्या फक्त भावाकडेच मोबाईल आहे. ती याच मोबाईलमधून गणिते सोडवण्याचा सराव करत असतांना, वर्षा ठाकूर यांनी तीची भेट घेतली. तिच्याशी संवाद साधला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडथळे येत आहेत. मात्र या अडथळ्यांवर मात करून ते शिक्षण घेत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.