नांदेड- शहरातील हनुमानगड भागात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुनील गरड या युवकावर तिघांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात सुनील जखमी झाला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सुनील गरड हा हनुमानगर भागात वास्तव्यास आहे. २ नोव्हेंबर रोजी सकाळी दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी त्याच्यासोबत वाद घातला. काही कळण्याच्या आत तरुणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाले. दरम्यान, ही घटना स्थानिक नागरिकांनी दामिनी पथकाच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी जखमी सुनील यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर हल्ला जुन्या भांडणातून झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या घटनेच्या काही वेळापूर्वी कामठा परिसरात दुचाकीवर आलेल्या तिघांनी दोन मुलांच्या हातून मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली होती. सुनीलवर हल्ला करणारे व कामठा भागात लुटमार करणारे आरोपी एकच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकास ताब्यात घेतल्याची माहिती आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा- नांदेडमध्ये वीज पडून आजोबा-नातवाचा मृत्यू