नांदेड - पतीने आणलेले घोरपडीचे मटन करण्यास पत्नीने नकार दिल्याने पती-पत्नीत प्रचंड राडा झाला. यावेळी पतीने पत्नीचा गळा दाबला असता, पत्नीने खंजीराने वार करत पतीचा गळा चिरला. ही घटना शहरातील गोविंद नगरात घडली असून अरबाज उर्फ अब्बू पठाण असे जखमी पतीचे नाव आहे. तर सीमा पठाण असे वार करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. जखमी अरबाजला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अरबाजने शुक्रवारी घोरपडीचे मटन घरी आणले होते. यावेळी त्याने मटनाची भाजी करण्यास पत्नी सिमाला सांगितले होते. परंतु तिने घोरपडीच्या मटनाची भाजी करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद होवून हाणामारीची घटना घडली. अरबाजने सीमाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या सीमाने घरातील खंजरने अरबाज पठाण याच्या गळ्यावर वार केला. या घटनेत अरबाज रक्तबंबाळ होवून गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरेफखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सीमा पठाणविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात कलम ३०७ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार सीमा पठाणने दिली. या प्रकरणी अरबाज उर्फ अब्बुच्या विरुद्धही कलम ३०७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.