नांदेड - राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी देशातील जवळ-जवळ १२ राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले (Raids on PFI). या छाप्यात १००हून अधिक जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे छापे दहशतवादी कारवायांसाठी करण्यात आलेल्या आर्थिक मदतीप्रकरणी असल्याचे समजते. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. ज्या PFI संघटनेवर ही कारवाई करण्यात आली ती आहे तरी काय (What is PFI organization ). कधी स्थापन झाली, त्यांचे काम काय आणि त्यांच्यावर काय आरोप आहेत, हे समजून घेऊयात (what charges against PFI).
काय आहे PFI - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक इस्लामिक संघटना आहे. मागास आणि अल्पसंख्यांकाच्या अधिकारासाठी काम करणारी संस्था अशी स्वत:ची ओळख ते सांगतात. पण देशात झालेल्या अनेक दंगलीच्या मागे या संघटनेचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. या संघटनेबद्दल असे बोलले जात आहे की त्यांचे केरळ मॉड्यूल दहशतवादी संघटना ISISसाठी काम करते. केरळमधून या संघटनेचे सदस्य सिरिया आणि इराकमधील ISISमध्ये सामील झाले होते.
संपूर्ण नियंत्रण केरळमधून होते - PFI ची निर्मिती १९९३ साली स्थापन झालेल्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंटमधून झाली. १९९२ साली बाबरी मशिद पाडल्यानंतर नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट नावाच्या संघटनेची स्थापना झाली होती. २००६ साली हा फ्रंट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियामध्ये विलिन झाला. अधिकृतपणे या संघटनेची सुरुवात १७ फेब्रुवारी २००७ रोजी झाली. याचे संपूर्ण नियंत्रण केरळमधून होते. असे असले तरी त्यांचे नेटवर्क संपूर्ण देशभरात आहे.
कशी होते भरती - राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, पीएफआय देशातील २३ राज्यात सक्रिय आहे. या संघटनेने दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते पश्चिम भागात नेटवर्क उभे केले आहे. संघटनेचे कार्यकर्ते मुस्लिम युवकांचे ब्रेनवॉश करतात. तेलंगणा पोलिसांच्या कोर्ट डायरीनुसार पीएफआय मदत निधी गोळा करून मुस्लिम युवकांना असामाजिक कामासाठी प्रशिक्षण देते.
रिपोर्ट्सच्या नुसार, पीएफआयचा हेतू अतिशय धोकादायक आहे. सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली परदेशातून निधी गोळा करणे आणि दहशतवादी मॉड्यूल तयार करणे, भारताविरुद्ध प्रचार करणे, शाळा-कॉलेजमधून नव्या तरुणांची भरती करणे, मुलांचे ब्रेनवॉश करणे, तरुणांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणे, दगड फेकण्याचे प्रशिक्षण देणे, शांततेत सुरू असलेल्या मोर्चाला हिंसक करणे अशी कामे केली जातात.
संघटनेवरील आरोप -
- देशात दंगल घडवणे, राजकीय हत्या आणि लव जिहाद प्रकरणी या संघटनेचे नाव समोर आले आहे.
- २०१० मध्ये केरळमधील एक प्राध्यापक टी जे जोसेफ यांना टार्गेट करण्यात आले होते. त्यांनी प्रश्नपत्रिकेवर मोहम्मद असे लिहले होते. त्यावर धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी त्यांचा हात कापण्यात आला होता. पीएफआयचे एखाद्या प्रकरणात नाव समोर येण्याची ही पहिली घटना होती.
-२०१६ साली बेंगळुरू येथे आरएसएस नेता रुद्रेश यांची हत्या झाली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले चारजण पीएफआयशी संबंधित होते.
कन्नूर जिल्ह्यात एक ट्रेनिंग कॅम्प चालवण्याचा आरोप झाला आहे. या कॅम्पमध्ये तलवार, बॉम्ब, पिस्तुल आणि अन्य गोष्टी सापडल्या होत्या.
- जुले २०२२ साली पटना पोलिसांनी फुलवारीत छापे टाकले होते. त्यात दहशतवादी कटाचा खुलासा झाला होता. या कटात पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्यात येणार होते. सप्टेंबर २०२२ मध्ये अतहर आणि अलाउद्दीन यांना अटक करण्यात आले होते. या दोघांकडून इंडिया २०४७ अशी कागदपत्रे सापडली होती. त्यानुसार पुढील २५ वर्षात भारताला मुस्लिम राष्ट्र करायचे म्हटले होते.
उल्लेखनिय बाब म्हणजे नांदेडमधील पाच जणांसह 20 पीएफआय कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून आज ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआयचे काही कार्यकर्ते देशविरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत अशी माहिती मिळाली होती असे औरंगाबाद एटीएसचे एसपी संदीप खाडे सांगितले आहे. त्यावरुन ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.