नांदेड - कोरोनाच्या धास्तीमुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले असताना, शहरातील अनेक भागात पाणी येत नसल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. विष्णूपुरी स्टेशनमधील एक मोटार नादुरुस्त झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नळातून पाणी येणे बंद झाले असून, कोरोनामुळे घराच्या आत राहण्याऐवजी लोकांना पाण्यासाठी घराच्या बाहेर पडावे लागत असल्याचे सांगण्यात येते.
नादुरूस्त झालेली मोटार दुरूस्तीसाठीची संचिका केवळ 'टेबल-बाय-टेबल' फिरल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटंकती करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या दुष्टचक्रात निर्माण झालेल्या या कृत्रिम पाणीटंचाई कडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले. नागरिकांनीही आज ऐवजी उद्या पाणी येईल, असे समजून दोन दिवस तिकडे लक्ष दिले नाही. नंतर मात्र काही जागरूक नागरिकांनी नगरसेवकांकडे याबाबत विचारणा केल्यानंतर जुन्या नांदेडातील एका नगरसेवकाने याबाबत समाज माध्यमावर एक पोस्ट टाकून मोटार बंद असल्याबाबतची माहिती नागरिकांना दिली आणि त्यावर दोन दिवसात तोडगा निघेल, असे आश्वासनही दिले होते. मात्र, त्या घटनेलाही चार दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. कोरोना आणि पाणीटंचाई या दुहेरी संकटात नागरिक आहेत.