नांदेड : पावसाळा सुरू झाली की शासकीय, खासगी अशा प्रत्येक रुग्णालयात साथीच्या रुग्णांची मोठी संख्या असते. त्याचाच परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णसंख्येतही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयातील ओपीडी तपासणीचे प्रमाण 60 टक्क्यांपर्यंत घटले असून, कोविडच्या रुग्णांत मात्र चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोविड आणि साथीचे आजार या संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा...
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या 5 हजाराच्या वर गेली असून 188 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच पावसाळ्यात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजाराचे रुग्ण सापडत असतात. यावर्षीही पावसामुळे या साथीच्या आजारांनी चांगलेचे डोके वर काढले असून कोरोनाचे रुग्ण वाढण्यात याचा मोठा हातभार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. शासकीय रुग्णालयात गतवर्षी दररोज किमान 1 हजार ते 1 हजार 200 रुग्ण तपासणीसाठी येत असत. यातील बहुतेक जणांना साथीच्या आजाराने ग्रासलेले असायचे. यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयाकडे रुग्णांनी पाठ फिरवली आहे. ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही प्रचंड कमी झाले असून 60 टक्क्यांपर्यंत हे प्रमाण घटले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक वाय. एच.चव्हाण यांनी दिली.
कोविड आणि साथीच्या अनेक आजारांची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे, कोविड आणि साथीचे आजार यामधील फरक ओळखणे प्राथमिक अवस्थेत तज्ज्ञांना अवघड होऊन बसले आहे. या संदर्भात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे औषध-वैद्यकशास्त्रचे विभाग प्रमुख डी. पी. भुरके म्हणाले, पावसाळ्यात व्हायरल फिव्हर, मलेरिया, डेंग्यू, टायफाईड, कॉलरासह अनेक आजार असतात. त्यामुळे कोरोना आणि साथीच्या आजारात फरक ओळ्खणे खूप कठीण आहे. तरीही आम्ही प्रथमतः आम्ही कोविडची स्वॅब टेस्ट घेऊन त्याचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास त्या रुग्णावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जातात. तर, इतर साथीचे आजार असल्यास त्याला इतर वॉर्डात दाखल केल्या जाते. तस पाहिलं तर अनेक आजारांची आणि कोविडची लक्षणे सारखी असल्यामुळं सध्या तरी टेस्ट करून घेणं हाच उपाय आहे, असे ते म्हणाले.
साथीच्या आजारानुसार उपचार...!
गतवर्षीप्रमाणे या पावसाळ्यातसुद्धा साथीच्या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. कोविड आणि इतर आजरांची लक्षणे सारखीच असल्यामुळे अगोदर कोविडची चाचणी करून घ्यावी. रुग्णाचा चाचणी अहवाल जर निगेटीव्ह आला तर, त्या रुग्णांच्या लक्षणानुसार उपचार करत असतो. तर, चिकून-गुनिया, टायफाईड, मलेरिया आदी आजारांची टेस्ट करून उपचार केल्या जातात.
साथीच्या आजारांसह कोरोनाबाबत खबरदारी कशी घ्यावी ?
सध्या कोविडची वाढती रुग्णसंख्या आणि इतर आजारांच्या बाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या बाबतीत सोशल डिस्टंन्स, मास्क, स्वच्छता, सॅनिटायझर यांचा वापर, लक्षणे आढळल्यास तातडीने टेस्ट करून उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच साथीच्या आजारांबाबतीतही नेहमीप्रमाणेच खबरदारी घेणे आवश्यक असून डासांची उत्पत्ती होऊ न देणे, स्वच्छता बाळगणे, पाणी गाळून व फिल्टर पाणी पिणे, ताजी फळं खाणे अशी प्राथमिक सतर्कता व काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. शंकरराव चव्हाण, शासकीय महाविद्यालयाचे औषध-वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भुरके यांनी सांगितले.