नांदेड - शहरातील शिवाजीनगर मुख्य रस्त्यावरील एक दुकान फोडून चोरट्यांनी मोठा मुद्देमाल पळवला, तर दुसरीकडे चैतन्यनगरमध्ये एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला धाक दाखवून चार घरे फोडण्यात आली. या चार घरातील मोठा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी असलेली विशेष यंत्रणा निकामी झाली की काय? असे बोलले जात आहे.
इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला धाक दाखवून चार फ्लॅटमध्ये मोठी चोरी झाली. शहरातील चैतन्यनगर भागातील शिवविजय कॉलनी भागात ही घटना घडली. या इमारतीमधील सुरक्षा रक्षक मारुतीला एका चोरट्यानी चाकुचा धाक दाखवला आणि इतर तीन चोरटे इमारतीत घुसले. चोरट्यांनी जे घरी आहेत त्यांच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्या आणि बंद असलेले ४ फ्लॅट फोडून चोरी केली. या चारही घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. हे चारही घरमालक घरी नसल्याने नेमका मुद्देमाल किती गेला? याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, मोठ्या किंमतीचा ऐवज लंपास झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील गजबजलेल्या शिवाजीनगरमध्ये चोरट्याने दुकान फोडले. जय ट्रेडर्स या दुकानाची मागची भिंत फोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम आणि किंमती वस्तू चोरून नेल्या आहेत. दुकानात किती रुपयांची चोरी झाली? याचा अंदाज घेणे सध्या सुरू आहे. मात्र, मुख्य रस्त्यावरील दुकान फोडण्यापर्यंत चोरट्याची मजल गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पोलीस गस्त घालतात की नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. बुधवारीच एका व्यापाऱ्याचे १२ लाख रुपये पळवल्यानंतर आज या दोन घटना घडल्या. त्यामुळे शहरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे गुन्हे शोध पथक अस्तित्वात आहे की नाही? अशी शंका व्यक्त केली जात आहे.